संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. राज्यातील संपूर्ण नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काही नगरपरिषदेच्या निवडणुका चांगल्या चर्चेत होत्या.
त्यापैकी एक म्हणजे बारामती नगरपरिषदेची. आता बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल समोर आला असून अजित पवारांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आमनेसामने उभे ठाकले होते. तसेच या बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण ४१ प्रभाग असून त्यापैकी ८ प्रभागातील अजित पवार गटाचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे उर्वरित ३३ जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत अजित पवार यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे.
सचिन सातव काय म्हणाले?
बारामती नगरपरिषदेतील विजयानंतर सचिन सातव म्हणाले की, “मला बारामतीच्या जनतेने निवडणून दिलं त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो. मी कायम त्यांच्या ऋणात राहील. एकूण जागांपैकी ६ जागा विरोधकांच्या निवडून आल्या आहेत. त्यातील तीन जागा अपक्ष आणि तीन वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. या ६ ठिकाणी आमचा पराभव झाला, त्या ठिकाणी आम्ही नक्कीच जनतेत जाऊ आणि आमचं कुठं चुकलं? याचा आम्ही विचार करू. तसेच त्यांच्याही सेवेत आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, याची देखील ग्वाही देतो”, असं सचिन सातव यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
बारामती नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काका-पुतण्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान निर्माण केलं होतं. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही दोन्ही नेते आमने-सामने आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवला होता.त्यानंतर बारामती नगर परिषद निवडणुकीत १०० टक्के परिवर्तन होणार, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला होता. अजित पवार गटाचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी नगर परिषदेवर आमच्याच पक्षाची सत्ता येणार असंही युगेंद्र यांनी म्हटलं होतं.
युगेंद्र पवार यांनी म्हटलं होतं की, बारामती नगर परिषदेत १०० टक्के मतदार परिवर्तन घडवतील, असा आम्हाला विश्वास आहे. कारण-अनेक वर्षे नगर परिषदेवर जुनेच चेहरे निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी कामे केली नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या आहेत. बऱ्याच लोकांनी निवडून आल्यानंतर स्वत:चे हित बघितल्याने यंदा बारामतीकरांनी परिवर्तन करायचे ठरवले आहे. स्वच्छ प्रतिमेचे तरुण आणि उच्चशिक्षित उमेदवारांना या निवडणुकीत विजय मिळवून देण्याची मतदारांची इच्छा आहे. मतदानावेळी बुथवर फिरत असताना आम्हाला असं चित्र दिसून आलं असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं होतं.









