Maratha Reservation: ‘अंतरवाली सोडा, मुंबई गाठा’; मनोज जरांगेंचे मराठ्यांना आवाहन, ‘किमान पाच लाख मराठे मुंबईत आले पाहिजेत’…!


संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.

दि.३१ ऑगस्ट २०२६.

जालना : ”अंतरवाली सराटी सोडा आणि मुंबई गाठा. सहा सप्टेंबरपर्यंत मुंबईतील पाहुणे शोधा. ज्यांच्या घरी राहता येईल, त्यांच्या घरी जाऊन राहा. सात सप्टेंबरपासून हळूहळू मुंबईकडे निघा.

किमान पाच लाख मराठे मुंबईत आले पाहिजेत. गणपतीचे दर्शन घेत मुंबईत या,” असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे यांनी सोमवारी (ता.३१) अंतरवली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

मुंबईत तीन ते चार लाख मराठ्यांची घरे आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील मराठे मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईत आंदोलनासाठी येणाऱ्या मराठ्यांनी गनिमी कावा वापरावा, असेही जरांगे यांनी सांगितले.

”चर्चा अंतरवालीत होईल; मात्र तोडगा मुंबईत निघणार नाही. रद्द केलेली चार प्रमाणपत्रे द्यावीत, हाच तोडगा आहे. ही चार प्रमाणपत्रे शैक्षणिक आहेत. राजकीय बाबी आम्ही सोडून दिल्या आहेत. प्रमाणपत्रे रद्द होतच नाहीत, मग ती का रद्द केली? विनाकारण न्यायालयात जाण्याची वेळ आमच्यावर का आणली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

”१२ ते ३० सप्टेंबरदरम्यान आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी काढून घ्या. परवानगी दिली नाही तरी मी उपोषणाला बसणार. कोण काय वाकडे करते ते पाहू,” असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, ”एकेकाळी लाखोंच्या सभा होत होत्या; आता त्या पाच हजारांवर आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सभा मुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या सभांपेक्षा मोठ्या होत होत्या. आता त्यांना राजकीय अवकळा कळेल,” अशी टीका जरांगे यांनी केली.

”शिंदे यांनी दौरा रद्द केला होता. अधिकाऱ्यांनी कार्यक्रम घेण्यास जरांगे यांनी मुभा दिल्याचे सांगितल्याने सभा झाली. मला जर शिंदेंची सभा होणार आहे, हे रात्री कळले असते तर माझ्याआधी दहा-पंधरा लाख मराठे तेथे दाखल झाले असते. नांदेडचे मराठे विमानतळातही शिरले असते,” असा दावा त्यांनी केला.

”अर्धे मराठे पुढे निघा,” असे आवाहन करत मुंबई आंदोलनासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जरांगे यांनी केले.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!