एकीकडे मनोज जरांगेंची तब्येत खालावली, दुसरीकडे अंतरवालीत मराठा आंदोलकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं ?


संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.

दि.३ सप्टेंबर २०२६.

रवी जैस्वाल, प्रतिनिधी, जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका ४० वर्षीय मराठा आंदोलकाचा उपोषणस्थळीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दशरथ रायकर (वय ४०, रा. संगम, जि. बीड) असे मृत आंदोलकाचे नाव असून, प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे अंतरवाली सराटीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. सततच्या उपवासामुळे जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावली असून, राज्यभरातून हजारो समाजबांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत. बीड जिल्ह्यातील संगम गावचे रहिवासी असलेले दशरथ रायकर हेदेखील या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अंतरवाली सराटीत आले होते.

आंदोलक रायकर यांना अस्वस्थ वाटू लागलं अन्…

मात्र, उपोषणस्थळी असतानाच रायकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते कोसळले. त्यांना तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

अंतरवालीत तणावपूर्ण वातावरण

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची खालावणारी प्रकृती आणि त्यातच पाठिंब्यासाठी आलेल्या निष्ठावंत आंदोलकाचा झालेला मृत्यू, यामुळे अंतरवाली सराटीतील वातावरण अत्यंत भावूक आणि तणावपूर्ण बनले आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच बीड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी आणि मराठा आंदोलकांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!