“मतभेद असले तरीही सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो असायला हवा, पण.”, अमित ठाकरेंच्या कृतीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया…!


संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.

दि.६ सप्टेंबर २०२६.

Raj Thackeray on Amit Thackeray : पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध मुद्द्यांवरून प्राध्यापकांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी प्राध्यापकांच्या कार्यालयातील भिंतीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला होता. तसंच, तिथे गोंधळही घातला होता, याप्रकरणी अमित ठाकरेंसह २५ जणांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत आज राज ठाकरे यांनी अखेर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

अमित ठाकरे यांनी प्राध्यापकांच्या कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवायला लावला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशेजारी नरेंद्र मोदींचा फोटो असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. अमित ठाकरेंच्या या कृतीवर राज ठाकरे म्हणाले, “अमित पुण्याला गेलेला असताना मोदींचा फोटो काढण्यावरून वाद झाला. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या सर्व मंडळींच्या रांगेत दुसरं कोणी नाही बसू शकत.” ते ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळाव्यात बोलत होते.

कोणाबरोबर कोणाचे फोटो असले पाहिजेत हे कळलं पाहिजे

“सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो असायलाच पाहिजे. बाकी मतभेद १०० असतील. असले तरीही ते पंतप्रधान आहेत. पण त्यांचा फोटो दुसऱ्या भिंतीवर पाहिजे. त्या रांगेत नाही. सरकारी आस्थापना, शाळा, कोर्ट इत्यादी ठिकाणी या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. कोणाबरोबर कोणाचे फोटो असले पाहिजेत हे कळलं पाहिजे. त्यामुळे आताच सुधरवून घ्या”, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी धार्मिक वाद होऊन दोन गटांत तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले, “सरकारला तुम्हाला जातीच्या आणि धर्माच्या वादात गुंतवून ठेवायचं आहे. तुम्ही या वादात गुंतून राहिलात तर दुसरे प्रश्न विचारणार नाहीत. आज देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण सर्वाधिक झालं असून देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.”

भाषणादरम्यान राज ठाकरे पुढे म्हणाले, “आता १४ तारखेला गणपती येत आहेत, मला सर्वाधिक हीच भीती आहे की गणपतीदरम्यान दंगली घडवण्यात येतील. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात, जेणेकरून तुम्ही तेवढ्याच गोष्टीत अडकून राहिले पाहिजेत आणि बाकी सर्व गोष्टींकडे तुमचे दुर्लक्ष झाले पाहिजे.”


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!