बारामतीत हेल्मेट सक्ती ; नियम मोडल्यास दंड आणि कार्यालयात प्रवेश बंद


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती, दि. ३० मार्च : बारामती शहर आणि परिसरात दुचाकी वाहन चालक व प्रवाशांसाठी हेल्मेट सक्ती अधिक कडक करण्यात आली आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांनी याबाबत परिपत्रक जारी करून सर्व संबंधित विभागांना तात्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १२९ आणि संबंधित नियमांनुसार, दुचाकी वाहन चालक तसेच मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ४ वर्षांवरील सर्व व्यक्तींना हा नियम लागू राहणार असून, भारत मानक संस्थेने प्रमाणित केलेले (ISI) हेल्मेटच वापरणे आवश्यक आहे.

परिपत्रकानुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेट न घातल्यास वाहनचालकाला दंड आकारण्यात येईल तसेच वाहनचालकाचा परवाना (लायसन्स) ३ महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय, एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, शासकीय व निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा, बँका आदी ठिकाणी हेल्मेटशिवाय येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. संबंधित संस्थांचे प्रमुख आणि अधिकारी यांनाही यासाठी जबाबदार धरण्यात येणार आहे.

बारामती परिसरात दुचाकी अपघातांचे प्रमाण आणि मृत्यूदर वाढल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वतःची सुरक्षितता जपावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!