संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि. 27 जून 2026.
शिवणे : कोंढवे-धावडे येथील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाचनक्षमतेचे चिंताजनक वास्तव गुरुवारी समोर आले. शाळेला दिलेल्या भेटीदरम्यान फळ्यावर लिहिलेला सुविचार ३० पैकी २८ विद्यार्थ्यांना वाचता आला नाही.
केवळ दोन मुलींनाच तो वाचता आल्याने विद्यार्थ्यांच्या मूलभूत वाचनकौशल्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आमदार भीमराव तापकीर आणि महापालिकेच्या शाळा समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे यांनी गुरुवारी अचानक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची तपासणी केली असता, त्यांना मराठी, हिंदी वाचता आले, तसेच गणित ही सोडविता आली. मात्र, इयत्ता पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता अत्यंत कमी असल्याचे आढळले.
दरम्यान, या वेळी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी सुरेश उचाळे उपस्थित होते. राजवाडे यांनी पालकांशी संवाद साधून डीबीटीच्या निधीतून गणवेश, स्वेटर व शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्याचे आवाहन केले. पालकांनी या ठिकाणी दहावीपर्यंतची शाळा सुरू करण्याची मागणी केली.
शाळेच्या कारभारात गंभीर त्रुटी
अपेक्षित शैक्षणिक प्रगती दिसून आलेली नाही. शाळेत पहिली ते सातवीपर्यंत २८७ विद्यार्थी असून, सात शिक्षक कार्यरत आहेत, तर मुख्याध्यापकांचे पद रिक्त आहे. तपासणीदरम्यान शालेय दप्तरामध्येही त्रुटी आढळल्या. मागील वर्षी पर्यवेक्षिका आणि क्रीडा शिक्षकांनी शेरापुस्तकात नोंदी केल्या होत्या, मात्र त्यावर तारखा नमूद नव्हत्या. पालक सभेच्या वहीत केवळ पालकांच्या सह्या असल्याचे दिसून आले.
एका महिन्यात ठोस प्रगती दिसली नाही तर कडक कारवाई केली जाईल. अशाच प्रकारे महापालिकेच्या इतर सर्व शाळांचीही अचानक गुणवत्ता तपासणी करण्यात येईल.
– अरुण राजवाडे, अध्यक्ष, शिक्षण समिती, पुणे महापालिका.








