संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.५ सप्टेंबर २०२६.
दुधेबावी : फलटणला कॉलेजला जात असताना इलेक्ट्रिक स्कूटी डिव्हायडरला धडकून झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय युवती जागीच ठार झाली, तर तिची लहान बहीण व आजी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील विडणी (गाडे- पवारवस्ती) येथे घडली.
सिद्धी दशरथ पवार असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. घटनास्थळ व फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे, सिद्धी ही तिची लहान बहीण रिद्धी व आजी कौसल्याबाई यांच्यासह इलेक्ट्रिक स्कूटीवरून जात होती.
गाडे- पवारवस्ती परिसरातील पालखी महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील दुभाजकाला दुचाकीची जोरदार धडक बसली.
त्यात दुचाकी २० फूट अंतरावर असलेल्या विद्युत खांबावर आदळली. या अपघातात सिद्धीच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पाठीमागे बसलेल्या तिची लहान बहीण रिद्धी आणि आजी कौसल्याबाई या दोघी गंभीर जखमी झाल्या. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.









