संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.५ सप्टेंबर २०२६.
दीपक पडकर, बारामती : शहरातील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून १६ वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) पहाटे घडली. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, बारामती शहर पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास सुरू आहे.
बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर विद्यार्थिनी बारामतीतील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. पालकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ती अभ्यास आणि परीक्षेच्या तणावात होती. अभ्यास होत नसल्याची तसेच परीक्षेचे टेन्शन येत असल्याची माहिती ती आई-वडिलांशी बोलताना देत होती. गुरुवारी रात्री ती सुमारे साडेबारा वाजेपर्यंत अभ्यास करत होती. त्यानंतर टेरेसवर जाऊन येते, असे सांगून ती चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेली. बराच वेळ उलटूनही ती खाली न आल्याने वडील तिला पाहण्यासाठी वर गेले. त्यावेळी ती टेरेसच्या कड्यावर बसलेली दिसली. वडिलांनी आवाज देताच तिने अचानक खाली उडी मारल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना आहे.
गंभीर जखमी अवस्थेत तिला आई-वडील व शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे दाखल करण्यात आले. मात्र पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात पालक अथवा नातेवाईकांनी सध्या कोणाविरुद्ध संशय किंवा तक्रार व्यक्त केलेली नाही. यापूर्वीही ती घरातून निघून गेल्याची नोंद पोलिसांकडे असल्याने त्या घटनेतील कागदपत्रे व तपासातील बाबींचीही पडताळणी केली जात आहे.
दरम्यान, घटनास्थळ, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे, डिजिटल माहिती तसेच पालक, नातेवाईक, मैत्रिणी व शिक्षकांचे जबाब घेण्यात येत आहेत. अभ्यासाचा ताण हे पालकांनी सांगितलेले प्राथमिक कारण असले, तरी वैयक्तिक, शैक्षणिक, कौटुंबिक किंवा अन्य कारणांचीही पोलिसांकडून निष्पक्षपणे पडताळणी सुरू आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे









