बारामती पोटनिवडणुकीत लक्ष्मण हाके उतरणार का ? पहा नेमकं काय म्हणाले


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. यानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली असून रविवारी (16 मार्च) झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर केली.

ही निवडणूक जाहीर होताच सुनेत्रा पवार ही निवडणूक लढवतील आणि ही बिनविरोध होईल अशी चर्चा होती. मात्र, यानंतर आता या निवडणुकीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उतरणार असल्याचे समोर आले आहे. त्यांनी पवार कुटुंबावर टीका करत, लवकरच बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची की नाही? यावर निर्णय जाहीर करू, असे म्हटले.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, “बारामतीमध्ये जाऊन निवडणुकीसंदर्भात सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. कार्यकर्त्यांसोबत व्यापक बैठक घेऊन निवडणूक लढवायची का? आणि कोणी लढवायची? याबाबत निर्णय जाहीर केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. “बारामतीमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेले अहिल्यादेवींचे नाव बदलण्याचा जीआर हे शासन काढू शकते, आम्ही ते कधीही सहन करणार नाही. ओबीसींचे कोणतेच प्रश्न दिवंगत अजितदादा किंवा या सरकारने सोडवले नाहीत, आमची कोणतीही मागणी मान्य केली नाही. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असेल किंवा होस्टेलअसेल असे अनेक विषयांसाठी आम्ही झगडत होतो. मात्र , त्याला न्याय कधीच मिळाला नाही,” असे म्हणत त्यांनी टीका केली.

पवार कुटुंबीयांवर टीका

ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, “लोकशाहीमध्ये निवडणुका बिनविरोध होणे चुकीचे आहे. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेली निवडणूक ही अनुकंपा म्हणून आम्ही मानायची का?” असा सवाल त्यांनी उपस्थीत केला. तसेच, “अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी हे शपथविधी करतात. आजोबा, नातू अधिवेशनाला निघून जातात. मग दुःख फक्त आम्ही करायचे का?” असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

युगेंद्र पवार काय म्हणाले?

बारामती पोटनिवडणुकीबाबत युगेंद्र पवार म्हणाले की, “बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. काकींसाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ, बारामतीचे प्रश्न काकींच्या साथीने सोडवू. प्रत्येकाला निवडणुकी लढण्याचा अधिकार आहे, कोणी कुठेही निवडणूक लढू शकतो, ही लोकशाही आहे” असे म्हणत त्यांनी लक्ष्मण हाकेंच्या भूमिकेवर प्रत्युत्तर दिले.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!