संपादक – गणेश जाधव प्रतिनिधी – रोहित माने
कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामांचा भंडारा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला.
या उत्सवासाठी राज्यासह पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेतील पारंपरिक भाकणूक ऐकण्यासाठी भाविक पहाटेपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्षीच्या यात्रेत कृष्णात डोणे महाराज यांनी भाकणूक केली. पहाटे चार वाजता सुरू झालेला भाकणुकीचा सोहळा सकाळी सहा वाजेपर्यंत चालला. मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्याने भाविकांचे विशेष लक्ष या कार्यक्रमाकडे लागले होते.
भाकणुकीमध्ये जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा देण्यात आला. जगातील इस्लामिक राष्ट्रांमध्ये संघर्ष पेटेल, भारत-पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध होईल, तसेच चीन भारतावर आक्रमण करू शकतो, असेही सांगण्यात आले. या युद्धांमुळे मोठे नुकसान होईल आणि जगभर अस्थिरता निर्माण होईल, अशी भाकणूक करण्यात आली.
देशांतर्गत परिस्थितीबाबतही अनेक संकेत देण्यात आले. देशात महागाई वाढेल, राजकारणात मोठा गोंधळ उडेल आणि अनेक नेते मोठमोठ्या घोटाळ्यांमध्ये अडकून तुरुंगात जातील, असे सांगण्यात आले. तसेच साखर कारखान्यांचे व्यवस्थापक सुखात राहतील, छोटे पक्ष राज्याच्या राजकारणात प्रभावी होतील आणि कर्नाटक राज्याचे राजकारण डळमळीत होईल, असेही भाकीत करण्यात आले.
याशिवाय कोरोनापेक्षा मोठा आजार येईल, नैसर्गिक आपत्ती वाढतील, भूकंप व वादळे होऊन मोठे नुकसान होईल, अशीही भाकणूक करण्यात आली. कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठे भगदाड पडेल, तसेच रेल्वे, विमाने आणि मोठ्या वाहनांचे अपघात वाढतील, असेही सांगण्यात आले.
भविष्यात सामाजिक स्थितीतही बदल होण्याचे संकेत देत तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागेल, मानवी आयुष्य कमी होईल, विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल, असेही भाकीत करण्यात आले. तसेच हिंदू धर्माला चांगले दिवस येतील आणि जगातील अनेक देशांमध्ये हिंदू धर्माची स्थापना होईल, असेही भाकणुकीत सांगण्यात आले.दरवर्षीप्रमाणे यंदाची भाकणूकही ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक वर्षांपासून या यात्रेत होणाऱ्या भाकणुकीकडे भाविकांचे विशेष लक्ष लागलेले असते.









