संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि. १५ जुलै २०२६.
Baramati News: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याची, जनसामान्यांशी असलेल्या त्यांच्या नात्याची आणि त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीची हृदयस्पर्शी शब्दांत अभिव्यक्ती करणारी बारामतीचे कवी विनोद खटके यांची “ओ माऊली…” ही कविता सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
कविता वाचताना किंवा ऐकताना प्रत्येक श्रोत्याच्या मनाला चटका लावणारी ही रचना समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे.
“विकासाचा विठ्ठल आमचा नेलाय कुणी चोरून?” या ओळींनी सुरू होणारा भावनिक धागा संपूर्ण कवितेत कायम राहतो. कवीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना “विकासाचा विठ्ठल” अशी उपमा देत त्यांच्या अखंड कार्यशील स्वभावाचे, लोकांप्रती असलेल्या बांधिलकीचे आणि विकासासाठीच्या ध्यासाचे प्रभावी चित्रण केले आहे. “कामच त्याचा धर्म होता, कामच त्याची होती जात” या ओळींतून त्यांच्या जात व धर्मविरहित व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.
कवितेत वारकरी संप्रदायातील विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमांचा अत्यंत समर्पक वापर करून अजितदादांच्या अनुपस्थितीची वेदना अधिक गहिरी करण्यात आली आहे. “दार नसलेलं देऊळ त्याचं, तो नवसावाचून पावायचा” या ओळींतून सर्वसामान्यांसाठी सदैव उपलब्ध असलेल्या नेतृत्वाची आठवण जागी होते.
साहित्यिक व रसिकांच्या मते, ही कविता अजितदादांच्या असामान्य नेत्या विषयी जनमानसात असलेली आत्मीयता, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारी साहित्यकृती आहे. साधी, ओघवती आणि भावस्पर्शी शब्दरचना असल्याने कविता थेट हृदयाला स्पर्श करते.
अजित पवार यांच्या स्मृतींना शब्दरूपातून अभिवादन करणाऱ्या या कवितेने बारामतीसह राज्यभरातील नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या असून, “विकासाचा विठ्ठल” ही उपमा आता अनेकांच्या ओठांवर रेंगाळताना दिसत आहे









