वीजबिल थकवल्याने बारामतीत शेकडो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत, स्मार्ट मीटरमुळे थेट मुंबईतून कारवाई


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – शहरातील शेकडो वीज ग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारी अचानकच खंडीत झाला. बराच प्रयत्न करुनही हा वीजपुरवठा सुरळीत होत नाही म्हटल्यावर महावितरणने चौकशी केल्यानंतर वीजबिल न भरल्याने थेट मुंबईतूनच वीजपुरवठा खंडीत झाल्याचे समोर आले.

नवीन स्मार्ट मीटरच्या माध्यमातून थकबाकीदारांचा वीजपुरवठा आता थेट मुंबईतूनच खंडीत होणार असल्याने वेळेत वीजबिल भरण्याशिवाय आता पर्यायच राहणार नाही. वीजबिल थकीत असल्यास या पुढील काळात वीजपुरवठा सुरळीत राहू शकणार नाही. राज्यातील अडीच लाखांहून अधिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडीत करण्यात आला होता.

शुक्रवारी (ता. 20) दुपारी दीडच्या सुमारास अचानक बारामतीतील शेकडो घरांचा वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर पळापळ सुरु झाली. अनेकांनी तातडीने वीजबिल भरले, त्या नंतरच त्यांचा वीजपुरवठा सुरु झाला. जवळपास पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडीत राहिल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान बारामती उपविभागात 53 हजार वीज ग्राहकांपैकी आजपर्यंत 19 हजार ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवून पूर्ण झाले असून पुढील काळात टप्याटप्याने सर्व ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. दरम्यान बारामती विभागातील आज 921 ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणने वीजबिल न भरल्याने खंडीत केला होता.

या पुढील काळात वीजबिल भरण्याची तारिख ओलांडल्यानंतर कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडीत होण्याचा धोका असल्याने वेळेत बिल भरण्याशिवाय पर्यायच उरणार नाही. स्थानिक पातळीवरील कार्यालयाकडे वीजपुरवठा पूर्ववत जोडण्याचा कसलाच अधिकार नसल्याने बिल भरल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत होणार अशी रचना आता तयार झाली आहे.

महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडे यादी आल्यानंतरच मुंबईतून अशा पध्दतीने वीजपुरवठा खंडीत झाल्याचे अधिका-यांना समजले. महावितरणच्या इतिहासात स्मार्ट मीटर बसल्यांनतर प्रथमच अशा प्रकारे थेट मुंबईतून वीजपुरवठा खंडीत केला गेला.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!